महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता बुद्धिबळाचे धडे! राज्यात प्रथमच बुद्धिबळाचा औपचारिक शिक्षणात समावेश

एसएनडीटी महिला विद्यापीठाने राज्यात प्रथमच बुद्धिबळाला पदवीपूर्व स्तरावरील औपचारिक शिक्षणात समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चेतना (सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नोव्हेल ॲडव्हान्स्डमेंट) केंद्राच्या माध्यमातून हा दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता बुद्धिबळाचे धडे! राज्यात प्रथमच बुद्धिबळाचा औपचारिक शिक्षणात समावेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एसएनडीटी महिला विद्यापीठाने राज्यात प्रथमच बुद्धिबळाला पदवीपूर्व स्तरावरील औपचारिक शिक्षणात समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चेतना (सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नोव्हेल ॲडव्हान्स्डमेंट) केंद्राच्या माध्यमातून हा दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. बुद्धिबळतज्ज्ञ आणि संशोधक डॉ. मकरंद वेलणकर यांच्या सहकार्याने विकसित झालेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यापीठ आणि वेलणकर चेस इन्स्टिट्यूट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार हा उपक्रम सुरू झाला आहे.

एकूण ३० तासांचा हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी भाषेत ऑनलाइन पद्धतीने शिकवला जाईल. पदवीपूर्व स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन श्रेयांकांसह प्रमाणपत्र मिळेल, तर इतर सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत बुद्धिबळ शिक्षण पोहोचवणे यामुळे शक्य होईल, असे चेतना केंद्राचे संचालक डॉ. महेश कोलतमे यांनी सांगितले. एकाग्रता, सारासार विचार, विश्लेषणात्मक क्षमता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढविण्यावर या अभ्यासक्रमात विशेष भर दिला जाणार आहे.

डॉ. मकरंद वेलणकर यांनी सांगितले की, बुद्धिबळाकडे केवळ स्पर्धात्मक खेळ म्हणून न पाहता व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे प्रभावी माध्यम म्हणून पाहणे आवश्यक आहे. औपचारिक अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक चौकट तयार होऊ शकते. १९८६ पासून बुद्धिबळ प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. वेलणकर पुण्यातील पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ पंच आहेत. त्यांनी या विषयात पीएचडी प्राप्त केली असून ‘चेस फॉर सेल्फ-डेव्हलपमेंट’ अभ्यासक्रम आणि ‘चेस थेरपी’ ही अभिनव संकल्पना विकसित केली आहे.

बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि तार्किक विचारशक्ती वाढते. हा अभ्यासक्रम केवळ खेळ शिकवणार नाही तर दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमताही वाढवेल. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांनाही प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि कौशल्य विकसनासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पहिल्या तुकडीचा कालावधी डिसेंबर ते फेब्रुवारी असा निश्चित करण्यात आला आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी https://sndtwuchetna.ac.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी प्रमाणपत्रासह अतिरिक्त श्रेयांकांचा लाभ घेऊ शकतील.