गौतम बुद्धांची मूर्ती हटवल्याने विद्यापीठात नवा वाद

विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात काही परदेशी विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात दिलेली  सुमारे पाच ते सहा फूट उंचीची आकर्षक आणि कलात्मक बुद्धाची मूर्ती सन्मानपूर्वक विभागात ठेवण्यात आली होती.

 गौतम बुद्धांची मूर्ती हटवल्याने विद्यापीठात नवा वाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागास (Department of Education)परदेशी संशोधक विद्यार्थ्यांनी दिलेली गौतम बुद्धांची (Gautama Buddha)मूर्ती प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे हटविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून विद्यार्थ्यांतर्फे येत्या 8 मे रोजी शांतता रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे याबाबतचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाला देण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात काही परदेशी विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात दिलेली  सुमारे पाच ते सहा फूट उंचीची आकर्षक आणि कलात्मक बुद्धाची मूर्ती सन्मानपूर्वक विभागात ठेवण्यात आली होती. ही मूर्ती विभागाच्या अंतर्गत जागेत शांततेचे प्रतीक म्हणून स्थापित करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे ती मूर्ती अचानकपणे हटविण्यात आली, असा आरोप राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी संघटनेतर्फे या गोष्टीचा निषेध करण्यात आला असून येत्या 8 मे रोजी सायंकाळी 7 वाजता 'बुद्ध हवा' या मागणीसह शांततेच्या मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या शांतता रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यापीठाचे कुलगुरू यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन जागतिक शांततेचे प्रतीक असलेले तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा सादर करणार आहेत. तसेच या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाचे मत परिवर्तन व्हावे आणि विद्यापीठाने समतेचे, समावेशकतेचे व भौतिक स्वातंत्र्याचे मूल्य जपावे, हा प्रयत्न केला जाणार आहे, असे कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी भेट म्हणून दिलेली मूर्ती स्वीकारण्यात आली. मात्र, त्यासाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असल्याचे नंतर निदर्शनास आले. त्यानुसार विभागातर्फे प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया समजून घेतली जात आहे.मान्यता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मूर्ती स्वीकारली जाणार आहे. 

_______________________

तथागत गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत. संपूर्ण जगाने त्यांना शांततेचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. शिक्षणशास्त्र विभागांमध्ये बसवलेली बुद्धाची मूर्ती विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ हटवायला सांगणे. हे खूप भयानक आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. 
- सागर सोनकांबळे
---------------------------------- 
तथागत गौतम बुद्धांची मूर्ती हटवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचा जाहीर निषेध. आम्ही उद्या सायंकाळी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. सर्वांना आव्हान आहे की त्यांनी या शांत रॅली मध्ये सहभागी व्हावे. 
- अक्षय कांबळे, NSUI

_________________________________

संविधानिक मूल्यांवर चालणाऱ्या विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये एकाच विचारधारेच्या धार्मिक प्रतीकांचा उदोउदो करून इतर धर्माविषयी असहिष्णुता दाखवण्याचे काम विद्यापीठाकडून केले जात आहे. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये, विभाग प्रमुखांच्या कार्यलांमध्ये विविध धर्मांची प्रतीके आहेत. तरीसुद्धा फक्त बुद्धांच्या मूर्तीला शिक्षणशास्त्र विभागातून बाहेरचा रास्ता दाखवणे संविधानातील धार्मिक सहिष्णुतेच्या तत्वांचे उल्लंघन आहेच.

ॲड. अक्षय दहिफळे

_________________________