"...तर प्रलय येईल! संमेलनाध्यक्ष डाॅ. रविंद्र शोभणे यांचा सरकारला गर्भित इशारा

एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेतर तर दुसरीकडे आज हजारो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत म्हातारे झाले आहेत.

"...तर प्रलय येईल! संमेलनाध्यक्ष डाॅ. रविंद्र शोभणे यांचा सरकारला गर्भित इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अपार कष्ट करुन, शिक्षणासाठी रात्रीचा दिवस एक केला जातो. एवढे करुन तरुणांच्या नोकरीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर चालला आहे. बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असते . ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, असा थेट इशारा संमेलनाध्यक्ष डाॅ. रविंद्र शोभणे यांनी राज्य सरकारला दिला.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी अमळनेर येथे झाले. याप्रसंगी डाॅ. रविंद्र शोभणे बोलत होते. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे व महामंडळाचे सर्व पदाधिकारी, आयोजक आदी उपस्थित होते.

शोभणे  म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आता आपल्याला काहीही करायचे नाही, असे ठरवून सरकारने या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेतर तर दुसरीकडे आज हजारो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत म्हातारे झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात. असा खडा सवालही शोभणे यांनी केला.

राज सत्तेने धर्मसत्तेला आपल्या अंकित ठेवले
प्राचिन काळी धर्म सर्वाेच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये ही धर्माची वेगळी गरज म्हणून निर्माण झाली. पुढे राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच आपल्या अंकित ठेवले.पुढे हाच राजा सर्वाेच्च समजला जाऊ लागला, धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला, इतिहासाची हीच चक्रे आता पुन्हा नव्या रूपाने फिरू लागली आहेत, याकडेही शोभणे यांनी आपल्या भाषणात आवर्जुन लक्ष वेधले.