प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स: ‘मिशन पर्यावरण’ बालचित्रपटाच्या लेखनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
‘मिशन पर्यावरण’ या बालचित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) ‘U’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल माध्यमांचा प्रभावी वापर करून साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाप्रती आदर आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी यांचा संदेश बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूजा नेटवर्क
पर्यावरण संवर्धनाचा संदेश आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशील माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न करणाऱ्या प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे येथील कार्यरत दाम्पत्य प्रियांका मयूर खेडकर आणि मयूर खेडकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रियांका खेडकर लिखित आणि मयूर खेडकर दिग्दर्शित ‘मिशन पर्यावरण’ (Mission Paryavaran) या शैक्षणिक बालचित्रपटाच्या लेखनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. या कामगिरीबद्दल प्रियांका खेडकर यांना ‘IBR Achiever’ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
‘मिशन पर्यावरण’ या बालचित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) ‘U’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल माध्यमांचा प्रभावी वापर करून साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाप्रती आदर आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी यांचा संदेश बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या डिजिटल युगात चित्रपट आणि दृकश्राव्य माध्यमे विद्यार्थ्यांच्या विचारविश्वावर प्रभाव टाकणारी महत्त्वाची साधने ठरत आहेत. याच माध्यमांचा शैक्षणिक उद्देशाने वापर करत पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची संकल्पना खेडकर दाम्पत्याने या चित्रपटातून मांडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार, निसर्गाविषयी संवेदनशीलता आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या यशाबद्दल प्रियदर्शनी स्कूलच्या व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रियांका खेडकर व मयूर खेडकर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या लेखन, दिग्दर्शनातील कल्पकता आणि पर्यावरण संवर्धनाच्या विषयाला शैक्षणिक माध्यमातून दिलेल्या अभिव्यक्तीचे विशेष कौतुक करण्यात आले.
खेडकर दाम्पत्याच्या या यशामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या या कामगिरीमुळे प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यातही अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांना आणि समाजाला प्रेरणा मिळावी, अशा शुभेच्छा शाळा व्यवस्थापन आणि कर्मचारीवृंदाने व्यक्त केल्या.