TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे

TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

TAIT परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० मे पर्यंत देण्यात आली होती मात्र आता अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता उमेदवार १४ मे पर्यंत अर्ज करू शकणार असून ऑनलाईन आवेदनशुल्क भरण्याची मुदत देखील १४ मे रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे.

यंदा डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र (Student Eligibility) असणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दि. ०५/०५/२०२५ पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतूदीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पुनःश्च ऑनलाईन आवेदनपत्र भरावे. पुनःश्च भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल असेही परिषदेमार्फत सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षा घेण्याचे आयोजन दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले असून B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांचा परीक्षा कालावधी दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे दि. १४/०५/२०२५ पर्यंत सादर करावी. जेणेकरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) २०२५ परीक्षेला प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांचे परीक्षेच्या बॅचेसचे नियोजन करणे सुलभ होईल. तसेच उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल अशा सूचना देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.