शिक्षण उपसंचालकाकडे सापडले ५८० बोगस शिक्षकांच्या 'शालार्थ आयडी'चे पुरावे
सायबर पोलिसांनी धंतोली येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात निरीक्षण पंचनामा करीत उपसंचालक उल्हास नरड यांच्या संगणकाची तपासणी केली. यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी केलेल्या ५८० शिक्षकांबद्दलचे महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भंडारा जिल्ह्यातील ५८० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या (580 teaching-non-teaching staff) बोगस भरतीने (Bogus recruitment) राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता रोज एक-एक नवीन खुलासे बाहेर येत आहेत. सायबर पोलिसांनी धंतोली येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात (Office of the Deputy Director of Education) निरीक्षण पंचनामा करीत उपसंचालक उल्हास नरड (Deputy Director Ulhas Narad) यांच्या संगणकाची तपासणी केली. यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी केलेल्या ५८० शिक्षकांबद्दलचे महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकास शालार्थ आयडी प्रदान करून वेतनास मंजुरी देण्याच्या प्रकरणात अटक झालेले उपसंचालक उपसंचालक उल्हास नरड सध्या सायबर पोलिसांच्या कस्टडीत आहेत. अटकेनंतर अशाप्रकारे नागपूर विभागातील शेकडो शिक्षकांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे नियुक्ती मिळविल्याचे व आर्थिक व्यवहार करून उपसंचालक कार्यालयातून शालार्थ आयडी मंजूर करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
तक्रारींचा पंचमाना करण्यासाठी उल्हास नरड यांना घेऊन सायबर पोलिसांचे पथक उपसंचालक कार्यालयात दाखल झाले. पथकाने नरड यांच्या संगणकाची तासभर तपासणी केली. या संगणकामधून संशयित असलेल्या ५८० बोगस शिक्षकांच्या शालार्थ आयडीसाठी कधी प्रस्ताव आला, आयडी कधी मंजूर झाली याबाबतचे महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती दिली आहे. संगणकासह पोलिसांनी कार्यालयातील इतरही दस्तऐवजाची तपासणी केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी उपसंचालक कार्यालयातील अटक झालेल्या सूरज नाईक याचाही लॅपटॉप जप्त केला होता.