CET सेल की लुटीचा धंदा; 'मॉक टेस्ट'साठी अव्वाची सव्वा फी; विद्यार्थ्यांमध्ये संताप
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वीच आठशे ते एक हजार रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आला आहे. त्यानंतर आता माॅक टेस्ट साठी तब्बल सहाशे रुपये तर प्रवेश निश्चित करण्यासाठी १ हजार रुपये घेतले जातात. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांनी शिकायचे का नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देताना अनेक अडचणी येतात. यासाठी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षांसाठी (State Common Entrance Test) यावर्षी प्रथमच १८ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मॉक टेस्टची (Mock test) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेसाठी अव्वाच्या सव्वा फी घेतली जात आहे. या माॅक टेस्टसाठी ५०० रुपये फी (Mock Test Fee) अधिक ९० रुपये जीएसटी,असे एकूण ५९० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे सीईटी सेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की, लुटीसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वीच एक हजार रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आला आहे. त्यानंतर आता माॅक टेस्ट साठी सहाशे रुपये तर प्रवेश निश्चित करण्यासाठी १ हजार रुपये घेतले जातात. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांनी शिकायचे का नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेत अडचणी येऊ नये, त्यांना अधिकाधिक फायदा व्हायला हवा. मात्र, हा उद्देश बाजूला ठेवून सीईटी सेलने विद्यार्थ्यांची लुट करण्याचे धोरणच आखले असल्याचे दिसून येत आहे.
एमएचटी सीईटी अंतर्गत विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १७ ते १८ लाखांच्या घरात आहे. या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जर माॅक टेस्ट परीक्षेसाठी सहाशे रुपये घेतले जात असेल तर त्यातून कोटींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे सीईटी सेल विद्यार्थ्यांच्या हितासाठी नाही तर लुटीसाठी काम करत आहे का? अशी शंका घेतली जात आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाकडून गरीब मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश दिला जातो.मग मॉक टेस्टसाठी एवढी रक्कम या मुली कोठून भरणार? असाहे सवाल उपस्थित केला जात आहे.
या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना पाच परीक्षा दिल्या जातील. मॉक टेस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पाच परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत होईल आणि परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळीचा अंदाज येईल, असा उद्देश बाजूला राहिला असून यातील अर्थकारण समोर आले आहे. काही विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधला असता त्यांना अधिकची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच एज्युवार्ताच्या प्रतिनिधीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
________________________________________
ज्या एजन्सी कडून प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जात असेल, त्याच एजन्सीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून मॉक टेस्ट घेणे उचित ठरणार नाही. कारण संबंधित एजन्सीकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे आणि आणि त्या गुणांवरूनच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश दिले जाते, अशा एजन्सीने शुल्क आकारून मॉक टेस्ट घेतल्यास पुढील काळात संबंधित एजन्सीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
- हरीश बुटले, संस्थापक, डीपर, पुणे
__________________________________________
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए कडून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जातात.परंतु, त्यांच्याकडून एकाही मॉक टेस्टसाठी शुल्क आकारले जात नाही.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तुलनेने प्रवेश शुल्क जास्त आकारले जाते. त्यात जर मॉक टेस्टसाठी एवढे शुल्क आकारले जात असेल तर ते योग्य होणार नाही. खासगी क्लास चालक सुध्दा एका मॉक टेस्टसाठी 50 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारात नाही.त्यामुळे राज्य शासनाने याबाबत पूनर्रविचार करायला हवा.
- दूर्गेश मंगेशकर, संस्थापक, संचालक, आयआयटीपीके
-------------------------------------------------------
CET सेल फक्त विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्यासाठी तयार झालेले दिसतेय. LLB ३ वर्ष CET परीक्षा देण्यासाठी मी १००० रुपये भरलेत. आता मॉक टेस्ट साठी ५९० रुपये मागितले जात आहेत. अजून कॅप राऊंड, प्रवेश निश्चिती साठी देखील पैसे भरावे लागतील. म्हणजे फक्त CETच्या माध्यमातून प्रवेश निश्चित होईपर्यंतच मला तीन - साडेतीन हजार रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी द्यावे लागणार आहेत . NEET - JEE सारख्या परीक्षा होताना विद्यार्थ्यांना शासनाकडून फ्री मॉक टेस्ट देण्याची संधी दिली जाते. मग महाराष्ट्राच्या CET सेलला विद्यार्थ्यांना एवढे पैसे का द्यावे लागतात. आम्ही मॉक टेस्ट दिली नाही आणि त्यातलेच प्रश्न जर मुख्य परीक्षेत आले तर ५९० रुपये न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, अशी भीती आहे. काही चौकशी करण्यासाठी CET पोर्टल वरील हेल्पलाईन नंबरला कॉल देखील लागत नाहीत. कधीतरी लागलाच तर समोरून सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते.त्यामुळे सीईटी- सेल काडून विद्यार्थ्यांची पूर्णपणे आर्थिक लूट चालू आहे.
- परीक्षार्थी -विद्यार्थी