भावाला १० हजार आणि बहिणीला दीड हजार ही फसवणूक आहे; यशोमती ठाकूर यांचा आरोप 

सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. हि निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी

भावाला १० हजार आणि बहिणीला दीड हजार ही फसवणूक आहे; यशोमती ठाकूर यांचा आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एकीकडे राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना (Dear sister scheme) आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण केली आहे. तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत.निवडणुकांपूर्वी महिलांची अशी फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी, अशी  मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आपल्या 'एक्स' सोशल मिडिया अकाउंटद्वारे केली आहे. 

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा सहा ते बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदवीधारक तरूणांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. 

एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करत आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे. दरम्यान राज्यातील सुशिक्षित महिलांनाही सरकारने लाडक्या भावाच्या योजनेप्रमाणे सन्मानजनक रक्कम दिली पाहिजे. राज्यातील महिलांना सरसकट पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारने देऊन महिलांचा सन्मान करावा. राज्यातील महिला भगिनींची जर सरकारला खरोखरच काळजी असेल तर त्यांनी महिलांची दीड हजार रुपयात फसवणूक न करता त्यांना किमान पाच हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावेत.