सीए इंटरमिजिएट निकाल जाहीर; मुंबईचा नील शाह आणि नाशिकची चांदक साक्षी देशात अव्वल

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए इंटरमिजिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. हा निकाल icai.org या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला असून उमेदवार आपले लॉगिन तपशील टाकून तात्काळ निकाल तपासू शकतात.

सीए इंटरमिजिएट निकाल जाहीर; मुंबईचा नील शाह आणि नाशिकची चांदक साक्षी देशात अव्वल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए इंटरमिजिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर (CA Intermediate results declared) केला आहे. हा निकाल icai.org या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला असून उमेदवार आपले लॉगिन तपशील टाकून तात्काळ निकाल तपासू शकतात. निकालासोबत गुणवंतांची यादीही जाहीर झाली आहे. मुंबईचे नील राजेश शाह आणि नाशिकची चांदक साक्षी या दोघांनी प्रत्येकी ५०२ गुण मिळवून ८३.६७ टक्के गुणांसह देशभरात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गुणवंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर चेन्नईची श्रुती व्ही हिने ४९२ गुण (८२.००%) मिळवले आहेत, तर सुरतचे प्रेम अग्रवाल याने ४९० गुण (८१.६७%) मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या निकालाने मुंबई आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देशपातळीवर आपली छाप सोडली आहे.

उत्तीर्णतेच्या टक्केवारीबाबत गट १ मध्ये एकूण १ लाख ३०१ उमेदवारांपैकी २३ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी २३.१४ टक्के आहे. गट २ मध्ये ६८ हजार ४०० उमेदवारांपैकी १२ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याची टक्केवारी १८.९२% आहे. दोन्ही गट एकत्र दिल्याच्या ३८ हजार ३३९ उमेदवारांपैकी केवळ ५ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ही टक्केवारी १३.२१% एवढी आहे. यापूर्वीच्या काही परीक्षांच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असल्याने परीक्षेची स्पर्धात्मकता स्पष्ट होते.

निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी icai.nic.in किंवा icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर संबंधित कोर्सच्या लिंकवर क्लिक करून रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावे. यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल आणि गुणपत्रक डाउनलोड करता येईल.