UPSC Result : सिविल सेवा परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुण्यातील अर्चित डोंगरे या उमेदवाराने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ (UPSC Civil Services Result 2024) चा अंतिम निकाल जाहीर (Final results announced) झाला आहे. या निकालात पुण्यातील अर्चित डोंगरे (Archit Dhongare) या उमेदवाराने देशात तिसरा क्रमांक (Third rank in the country) पटकावला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येणार आहे.
प्रयागराजच्या शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले असून हर्षिता गोयल देशात दुसरी आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १ हजार ९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे, त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील, असे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती १७ एप्रिल २०२५ पर्यंत घेण्यात आल्या. मुलाखत फेरी ७ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाली. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २ हजार ८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. नागरी सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये १ हजार १३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १ हजार ५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या १ हजार १३२ पर्यंत वाढवण्यात आल्या.
अर्चित डोंगरे हा मराठी असून तो महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला (Pune) रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने पुण्यासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून भरभरून कौतूक केले जात आहे. मागील काही वर्षाचा निकाल पाहता यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाण्यासह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या रुपाने आणखीन काही आयएएस अधिकाऱ्यांची भर पडणार आहे.