पोलीस भरती : कारागृह विभागाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
सदर गुणतक्त्यातील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी २३ एप्रिल सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती- २०२२-२३ (karagruh shipai Bharti) मधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध (Merit list published) करण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर गुणतक्त्यातील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी २३ एप्रिल सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन आक्षेप नोंदवावेत, (Objection) असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती मधील ७७१२ पात्र उमेदवारांची पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात आली होती. सदर उत्तरतालिकेस अनुसरुन उमेदवारांनी सादर केलेल्या आक्षेपांनुसार फेरतपासणी करण्यात येवून १५ एप्रिल २०२५ रोजी शुध्दीपत्रकासह (Final Answer Key) प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर उत्तरतालिकेस नुसार लेखी परीक्षेकरिता उपस्थित राहिलेल्या एकूण ७४७३ उमेदवारांना मिळालेल्या गुणांची गुणवत्ता यादी (गुणतक्ता) प्रसिध्द करण्यात आली आहे. गुणवत्ता तक्त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना उत्तरपत्रिकेची (OMR Sheet) मुळ कार्बन प्रत व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिकेची (OMR Sheet) मुळ प्रत सोबत न आणल्यास आपले आक्षेपांची दखल घेतली जाणार नसल्याचे पोलिस उप आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.