जातीच्या भिंती तोडणाऱ्या पुण्यातील शैलजा पाईक यांना 8 लाख डॉलर्सचा अमेरिकेचा पुरस्कार
शैलजा पाइक यांना मिळालेली ही फेलोशिप आधुनिक भारतातील दलित स्त्रियांच्या जातीय भेदभाव, लैगिक शोषणावर त्यानी केलेल्या कार्याची पावती समजली जात आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील झोपडपट्टीत वाढलेल्या (Raised in the slums of Pune) आणि सध्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या दलित लेखिका, इतिहासकार तथा प्रोफेसर शैलजा पाईक (Dalit Writer, Historian and Professor Shailaja Paik) यांना बहुप्रतिक्षित "जिनियस ग्रँट" (Genius Grant) समजला जाणारा आठ लाख डॉलर्सचा (सुमारे ६.७ कोटी भारतीय रुपये) ‘मॅकआर्थर पुरस्कार’ (MacArthur Award) देण्यात आला आहे. सदर पुरस्कार मिळवणाऱ्या शैलजा पाईक पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत.
दरवर्षी, असाधारण क्षमता प्राप्त, विशेष उपलब्धी मिळवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. शैलजा या सध्या अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत असून त्यांचे दलित महिलांच्या स्थितीवर संशोधन कार्य सुरु आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली तसेच त्या इतिहासकार म्हणून ओळखल्या जातात.
शैलजा मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडयात जन्मलेल्या आहेत. लहाणपणापासून त्यांना जातीवादाचे भयंकर चटके बसले. लहाणपणी कथित उच्चवर्णीयांच्या घरी त्या आपल्या आजीसोबत गेल्या असता त्यांना खाली जमिनीवर बसवण्यात आले तर दुसऱ्या कथित उच्चवर्णीयांना खुर्चीवर बसवण्यात आले. गावातील सार्वजनिक ट्यूबवेल, विहिरीवर त्यांना पाणी भरू दिले जात नव्हते हा अपमान सहन न झाल्याने १९९० साली त्या कुटुंबासमवेत पुण्यातील झोपडपट्टीत राहण्यास आल्या.
दरम्यान, शैलजा यांना मॅकआर्थर पुरस्कार घोषित झाल्यावर, हे ऐकून आपल्या कानावर विश्वासच बसला नसल्याचे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. शैलजा पाइक यांना मिळालेली ही फेलोशिप आधुनिक भारतातील दलित स्त्रियांच्या जातीय भेदभाव, लैगिक शोषणावर त्यानी केलेल्या कार्याची पावती समजली जात आहे.