बाल विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे वादळ घराघरापर्यंत पोहोचेल - राज्यपाल रमेश बैस

५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे  उद्घाटन संपन्न

बाल विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे वादळ घराघरापर्यंत पोहोचेल - राज्यपाल रमेश बैस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे बाल वैज्ञानिक प्रदर्शन (Childrens Science Exhibitionहे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी व्यक्त केला. तसेच पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे सांगत डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविले, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

बैस म्हणाले, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार  अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले,  नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील. 

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

 बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.