प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जाधवर इन्स्टिट्यूट्सचा जीवनगौरव पुरस्कार

कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री राहीबाई पोपेरे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे, सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत हिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जाधवर इन्स्टिट्यूट्सचा जीवनगौरव पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नऱ्हे-मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात माजी खासदार व समाजसेवक प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मानाजीनगर येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल क्रमांक १ येथे हा सोहळा होणार आहे.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री राहीबाई पोपेरे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे, सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत हिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर असणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा उपक्रम

शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

जाधवर इन्स्टिट्यूट्सच्या माध्यमातून सुमारे २५ हजार विद्यार्थी व पालक आणि दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंत शैक्षणिक व सामाजिक उपक्रम पोहोचवले जातात. अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदलातील कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक यांच्या मुलांना केजी ते पीजीपर्यंतच्या शिक्षण शुल्कात २५ टक्के सवलत दिली जाते. तसेच ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाते.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून वर्धापनदिनानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.