IAS पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका, सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश..
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आयएएस झालेल्या पूजा खेडकर यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
माजी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरण देशभर गाजले. मात्र, आता केंद्र सरकारने खेडकर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ (Dismissal from Government Service) करण्याचे आदेश काढले आहेत. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र (Fake Disability Certificate) देऊन आयएएस झालेल्या पूजा खेडकर यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानुसार केंद्र सरकारने (Orders of the Central Government) पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केले आहे.
बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अखेरीस केंद्र सरकारने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक रिपोर्ट दाखल केला होता. यात पूजा खेडकरच्या दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे स्पष्ट केले. पूजा खेडकरने सिव्हिल सेवा परीक्षा २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती. मेडिकल अथॉरिटी अहमदनगर महाराष्ट्र यांनी ती जारी केली होती.
पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करून युपीएससीच्या निवडीत विशेष सवलत मिळवली होती. कमी गुण मिळाल्यानंतरही तिला दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सूट मिळाल्याने उत्तीर्ण होता आले. तिने 841 रँक मिळवली होती. अखेरीस दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिची प्रमाणपत्रे खोटी असल्याचे न्यायालयाच्या उघडकीस आणून दिले.
पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी सांगण्यात येत आहे. कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर शासकीय दिवा आणि महाराष्ट्र सरकारचे चिन्ह लावले. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते. स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. वाद वाढल्यानंतर तिची वाशिमला बदली सुद्धा करण्यात आली होती. अखेरीस आता केंद्र सरकारने पूजा खेडकर कार्यमुक्त केले आहे.