देशातील १४ केंद्रीय विद्यापीठांना कुलगुरू नाहीत; पाच हजारांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त !

देशातील ५६ केंद्रीय विद्यापीठांपैकी १४ विद्यापीठांमध्ये पूर्णवेळ कुलगुरूंचे पद रिक्त असल्याचे चित्र धक्कादायक आहे. यामध्ये १०९ वर्षे जुने बनारस हिंदू विद्यापीठ, १०४ वर्षे जुने बंगालचे विश्वभारती विद्यापीठ, बिहारचे प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ यांचा समावेश आहे.

देशातील १४ केंद्रीय विद्यापीठांना कुलगुरू नाहीत; पाच हजारांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एकीकडे शिक्षणाच्या माध्यमातून देशाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. तर नवीन शिक्षण धोरण लागू केले जात आहे, तर दुसरीकडे देशातील ५६ केंद्रीय विद्यापीठांपैकी १४ विद्यापीठांमध्ये कायमस्वरूपी कुलगुरूंचे पद रिक्त असल्याचे चित्र धक्कादायक आहे. (The post of vice-chancellor is vacant in 14 of the 56 central universities in the country) यामध्ये १०९ वर्षे जुने बनारस हिंदू विद्यापीठ, (Banaras Hindu University) १०४ वर्षे जुने बंगालचे विश्वभारती विद्यापीठ, (Visva-Bharati University of Bengal) बिहारचे प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ (Nalanda University) आणि महाराष्ट्रातील वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ (Mahatma Gandhi International Hindi University) यांचा समावेश आहे.

नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन २०२४ मध्येच झाले. याशिवाय, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (दिल्ली), इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (एमपी), बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठ (यूपी), गढवाल विद्यापीठ (उत्तराखंड), केरळ, सिक्कीम, नागालँड, पुडुचेरी, लडाख आणि मणिपूर क्रीडा केंद्रीय विद्यापीठ यांचा समावेश आहे. ११ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या या केंद्रीय विद्यापीठांपैकी सर्वाधिक दोन उत्तर प्रदेशात आहेत. या केंद्रीय विद्यापीठांमधील पदे एक महिना ते एक वर्ष रिक्त आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार  एकूण ४७ केंद्रीय विद्यापीठे शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत, तर नऊ केंद्रीय विद्यापीठे वेगवेगळ्या मंत्रालयांच्या अखत्यारीत आहेत. नालंदा विद्यापीठ परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यापीठ, पुसा, केंद्रीय कृषी विद्यापीठ, इंफाळ आणि राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशी हे कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत आहेत.
गती शक्ती विद्यापीठ रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, केंद्रीय क्रीडा विद्यापीठ क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत आणि भारतीय नौदल विद्यापीठ परिवहन मंत्रालयाच्या अंतर्गत आणि राजीव गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक विद्यापीठ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. यापैकी, केंद्रीय क्रीडा विद्यापीठ, क्रीडा मंत्रालय, मणिपूर येथे कायमस्वरूपी कुलगुरूंचे पद रिक्त आहे. 

शिक्षकांची ५ हजार १०० हून अधिक पदे रिक्त 

केंद्रीय विद्यापीठांमध्ये केवळ कुलगुरूच नाही तर मोठ्या संख्येने अध्यापन पदेही रिक्त आहेत. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिक्षण राज्यमंत्री सुकांता मजुमदार यांनी सांगितले होते की, " देशातील विविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५,१०० हून अधिक पदे रिक्त आहेत."