एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. सरकार लवकरच सर्व भरतींसाठी एकच पोर्टल (Single portal for all government recruitments) तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू करणार आहे. कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Minister of State Dr. Jitendra Singh) यांनी याविषयीची माहिती दिली आहे. यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये या विषयावर सहमती झाली आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, "सरकार सर्व सरकारी भरतींसाठी एकीकृत नोकरी अर्ज पोर्टल विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. या पोर्टलच्या मदतीने, सरकार अशा लोकांना अधिक सुविधा देऊ इच्छिते जे नोकरीसाठी वेगवेगळ्या पोर्टलवर माहिती शोधत राहतात. या उपक्रमामुळे नोकरी शोधणाऱ्यांची ऊर्जा आणि वेळ वाचेल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे."
या आदेशाबाबत मंत्रालयाने अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार, 'डॉ. जितेंद्र सिंह यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना 'सिंगल जॉब अॅप्लिकेशन पोर्टल' लवकरात लवकर विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेवर काम आधीच सुरू झाले आहे. जे लवकरच पूर्ण होईल.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, "संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील २२ भाषांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की, भरती प्रक्रियेचा कालावधी पूर्वी सुमारे १५ महिने होता, जो आता ८ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ते आणखी कमी केले जाईल."