SPPU EXAM : विद्यापीठाच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दिवाळी सत्र 2024 पदविका पदवी व पदवीधर अभ्यासक्रमाच्या नियमित व बॅकलॉग परीक्षा अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या लेखी प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन टप्प्याटप्प्याने 22 ऑक्टोबर पासून ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले आहे.

SPPU EXAM : विद्यापीठाच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) विविध अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर मधील परीक्षांचे (October-November exams)वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.येत्या 22 ऑक्टोबरपासून बहुतांश सर्व परीक्षांना सुरुवात (Exams start from 22nd October)होत आहे. तसेच विद्यापीठ स्तरावरील काही लेखी परीक्षा 12 तर काही 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षेबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दिवाळी सत्र 2024 पदविका पदवी व पदवीधर अभ्यासक्रमाच्या नियमित व बॅकलॉग परीक्षा अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या लेखी प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन टप्प्याटप्प्याने 22 ऑक्टोबर पासून ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. सर्व विद्या शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या म्हणजेच कला वाणिज्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या परीक्षा त्याचप्रमाणे विधी अभ्यासक्रमामधील पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात यावे. त्याचप्रमाणे परीक्षेचे वेळापत्रक तयार करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रत्यक्ष परीक्षांचे आयोजन करणे, उत्तर पत्रिका तपासणे,  विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या संरक्षित अंतर्गत प्रणालीमध्ये गुण भरणे इत्यादी सर्व कामे महाविद्यालय स्तरावरून करण्यात यावीत. 

पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्ष वगळून पदवीधर स्तरातील अभ्यासक्रमाची सर्व वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी व पदवीधर स्तरावरील सर्व वर्षांच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठ स्तरावरून करण्यात येणार आहे. परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन महाविद्यालय स्तरावर विद्यापीठाच्या परीक्षांच्या नियोजनाच्या धर्तीवर करण्यात यावे. याबाबत परीक्षकांची यादी व वेळापत्रक एक महिना दिलेल्या मुदतीत परीक्षा विभागाकडे सादर करून पूर्व मान्यता घेऊनच कार्यवाही करावी, अन्यथा आपल्या महाविद्यालयाचे निकाल राखीव ठेवले जातील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.