विटा येथील शासकीय निवासी शाळेतील २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
सांगली जिल्ह्यातील विटा येथील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्यानंतर त्यांना तात्काळ विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सांगली जिल्ह्यातील विटा येथील शासकीय निवासी शाळेत (Vita Government Residential School) राहणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (24 students get food poisoning) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्यानंतर त्यांना तात्काळ विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत कार्यरत डॉक्टर व शिक्षकांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
समाज कल्याण विभागाच्यावतीने विट्यात निवासी शाळा चालवली जात आहे. या निवासी शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला. रविवारी रात्री आहारात मटणाचे जेवण देण्यात आले होते. यानंतर आज सकाळपासून काही मुलांना उलटी, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाचवेळी २४ मुलांना त्रास सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर डॉक्टराना शंका आल्याने मुलांकडून चौकशी केली असता रात्री खालेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून २४ मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.