क्रिसमसच्या दिवशी 'एमपीएससी'चा पेपर ; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

२५ डिसेंबर रोजी क्रिसमस सणानिमित्त सार्वजनिक सुटी असतानाही परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.

क्रिसमसच्या दिवशी 'एमपीएससी'चा पेपर ; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने २५ डिसेंबर रोजी समाज कल्याणचा (Social Welfare Examination) सहायक आयुक्त व तत्सम, गट-अ व सहायक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट- अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी क्रिसमस  सणानिमित्त सार्वजनिक सुटी (Christmas public holiday) असतानाही परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.

दोन्ही संवर्गासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत  मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत निवासी वैद्यकीय अधिकारी गट – ब पदासाठी मुंबईत परीक्षा घेण्यात येणार आहे. 

त्यामध्ये २५ डिसेंबर रोजी क्रिसमसच्या सुटीच्या दिवशी समाजकल्याण व तत्सम गट-अ संवर्गातील सहायक आयुक्त, सहायक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट-अ या संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
________________________________________

सर्व धर्माचा आदर करणे हे आयोगाचे काम आहे. २५ डिसेंबर रोजी ख्रिचन धर्माचा वर्षातील सर्वात मोठा सण आहे याच दिवशी समाज कल्याणचा पेपर असल्याने या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन  
_________________________________________

सणाच्या दिवशीच परीक्षा आल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याच्या संदर्भाने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. क्रिसमसच्या  दिवशी परीक्षा घेणे हे  ख्रिश्चन धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांचे उल्लंघन आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोगाने या प्रकरणात योग्य विचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
 
- सूरज आढाव (स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी)