केव्हीएस राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे सलग दोन विजय
पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक १, वायुदल केंद्र, लोहगाव येथे २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांत एकूण १९ सामने खेळविण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ५५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत सुरू असलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाने सलग दोन विजय मिळवत दमदार कामगिरी केली. मुंबईने २७ ऑक्टोबर रोजी गुरुग्राम संघाचा आठ गडी राखून पराभव केला, तर २८ ऑक्टोबर रोजी आग्रा संघावर ५७ धावांनी मात केली. या स्पर्धेत चंदीगड, दिल्ली आणि हैदराबादच्या संघांनीही विजयी आगेकूच कायम ठेवली.
केंद्रीय विद्यालय संघटना, मुंबई विभागाच्या वतीने पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक १, वायुदल केंद्र, लोहगाव येथे २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांत एकूण १९ सामने खेळविण्यात आले.
२८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यांत हैदराबादने बेंगळुरूवर, तर चंदीगडने देहरादूनवर आठ गडी राखून विजय मिळविला. कोलकात्याने लखनौचा पाच गडी राखून पराभव केला. जम्मूच्या संघाने चेन्नईवर ९१ धावांनी मात केली.
यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीने कोलकात्याचा ५९ धावांनी, तर लखनौचा ८६ धावांनी पराभव केला. हैदराबादने भुवनेश्वरवर आठ गडी राखून विजय मिळविला. चंदीगडने तिनसुकियावर नऊ गडी राखून मात केली. अहमदाबादने गुवाहाटीला नऊ गडी राखून नमविले, तर जम्मूने एर्नाकुलमचा दहा गडी राखून पराभव केला. जयपूरने वाराणसीवर नऊ गडी राखून आणि रायपूरने रांचीवर पाच गडी राखून विजय नोंदविला. पाटणा संघाने गुवाहाटीवर ५४ धावांनी मात केली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिनसुकियाने देहरादूनवर दहा गडी राखून, चेन्नईने एर्नाकुलमवर आठ गडी राखून विजय मिळविला. भोपाळने वाराणसीचा ९६ धावांनी, तर जबलपूरने रांचीचा चार गडी राखून पराभव केला.
देशभरातील केंद्रीय विद्यालयांचे संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत विविध विभागांतील संघांमध्ये चुरशीचे सामने होत असून, आगामी सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.