एआय औषध तपासणीसाठी १९०० डॉक्टरांची भरती; आरोग्य विभागाचा कंपन्यांवर कडक वॉच
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, औषधांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा गुणवत्तेबाबत संशय आढळल्यास संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्या अनुषंगाने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कडक वाॅच ठेवण्यासाठी लवकरच तब्बल १ हजार ९०० पदांची भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी अवघ्या दीड ते दोन मिनिटांत पूर्ण होणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, औषधांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा गुणवत्तेबाबत संशय आढळल्यास संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्या अनुषंगाने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कडक वाॅच ठेवण्यासाठी लवकरच तब्बल १ हजार ९०० पदांची भरती केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यासाठी प्रत्येकी १ कोटी २० लाख रुपये किमतीची ८ यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. ही यंत्रणा देशात प्रथमच राबविण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संशयास्पद औषधांची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. औषधांच्या गुणवत्तेतील अनियमितता रोखण्यासाठी ही आधुनिक व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.

औषधांच्या दर्जावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील ८ विभागांत ८ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात २ सदस्य असतील. ही पथके दर महिन्याला सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांना अचानक भेटी देतील. भेटीदरम्यान औषधांचे नमुने गोळा करून तपासणी केली जाईल. गुणवत्तेत अनियमितता आढळल्यास संबंधित औषध कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल. यामुळे पुरवठा होणाऱ्या औषधांवर अधिक कडक देखरेख शक्य होणार आहे.
दरम्यान, राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टरांच्या भरतीची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ४०० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी सुमारे ६०० विशेषज्ञ डॉक्टर आहेत. आता पुढील टप्प्यात आणखी १ हजार ९०० डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात भरती हे दोन्ही निर्णय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहेत. यामुळे रुग्णांना चांगल्या दर्जाची औषधे आणि सक्षम वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे विभागाने नमूद केले आहे.