पुण्यातील क्रीडा विद्यापीठ अजून कागदावरच अन् दुसऱ्या विद्यापीठासाठी जोरदार हालचाली
छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी अधिनियम तयार करणे व आवश्यक सूचना करण्यासाठी शासन स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सरकारकडून (Maharashtra Government) छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. पण दुसरीकडे मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाकडे (International Sports University) दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्षा या विद्यापीठाला असून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी अधिनियम तयार करणे व आवश्यक सूचना करण्यासाठी शासन स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र अधिनियमाचे प्रारुप तयार करेल. तसेच क्रीडा विद्यापीठाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींच्या शिफारशी करणे, अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शिफारशी करण्याची जबाबदारी समितीवर असेल. याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा लागणार आहे.
PRN BLOCK : विद्यापीठ घेणार ८८ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा; दोन दिवसात येणार परीक्षेबाबत स्पष्टता
तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू व सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त, डॉ. अनिल कर्णिक, अंजली भागवत, डॉ. मकरंद जोशी, प्रधान सचिव सतिश वाघोले हे समितीचे सदस्य असतील. तर क्रीडा विभागाचे सह संचालक सदस्य सचिव असतील.
दरम्यान, पुण्यातील बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा तीन वर्षांपुर्वी करण्यात आली होती. या विद्यापीठातून क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमही सुरू केले जाणार होते. टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करण्याचे नियोजित होते. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत नसली तरी तेथील एका इमारतीतच तात्पुरते विद्यापीठ थाटण्यात आले आहे.
मात्र, अद्याप विद्यापीठाला पुर्णवेळ कुलगुरूंसह कुलसचिव, अधिष्ठाता, परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी आदी प्रशासकीय पदे मिळालेली नाहीत. प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही झालेल्या नाहीत. विद्यापीठामध्ये अद्याप एकही अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. त्यामुळे यापुर्वी स्थापन झालेल्या एका क्रीडा विद्यापीठाकडे दुर्लक्ष होत असताना दुसऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे चर्चांना उधाण आले आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k