पुणे शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे विजय; सर्वात कमी वयात विधान परिषदेवर
गावडे हे सर्वात तरुण उमेदवार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. पुणे शिक्षक मतदार संघाला आजगावकर यांच्यानंतर पुन्हा एकदा गावडे यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षक आमदार मिळाला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली असून अठ्ठाविसाव्या फेरी अखेरपर्यंत त्यांनी 23 हजार 117 मध्ये घेऊन विजय मिळवला आहे. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी गावडे यांना कडवी लढत दिली. मात्र पहिल्या पसंतीच्या मतात घेतलेल्या आघाडीमुळे गावडे विजयी झाले.
पुणे शिक्षक मतदारसंघात राजकीय नाट्य पाहायला मिळाले. महायुतीतून एकच उमेदवार देणे अपेक्षित असताना सुरुवातीला मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिल्यानंतर शेवटी चिवटे यांचा अर्ज मागे घेऊन अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगत दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर मोठे आव्हान उभे केले.
विद्यमान आमदार जयंत आजगावकर या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकले गेले तर दत्तात्रय सावंत यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. सचिन सानप यांनी दुसऱ्या क्रमांकाची 16 हजार 347 मते घेतली. तर कौस्तुभ गावडे यांनी 23 हजार 117 मते घेतली. त्यामुळे गावडे तब्बल सहा आजाराहून अधिक मतांनी निवडून आले.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यातून गावडे यांना पहिल्या पसंतीची भरघोस मते मिळाली. त्याचप्रमाणे कोल्हापूर परिसरातील शिक्षकांनी गावडे व आजगावकर यांनाच पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची मते दिल्याचे मतमोजणी दरम्यान आढळून आले. पहिल्या पसंतीच्या मतांची आघाडी दुसऱ्या क्रमांकही मिळालेली मते यामुळे गांवडे १६ हजारांहून २३ हजार मतापर्यंत पोहचली.
गावडे यांच्या उमेदवारी अर्जावरून न्यायालयात याचिका दाखल करण्याची बातमी काही दिवसापूर्वी समोर आली होती. गावडे यांचे वय अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपूर्वी केवळ तीन दिवस आधी तीस वर्ष पूर्ण झाले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.मात्र गावडे हे सर्वात तरुण उमेदवार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. पुणे शिक्षक मतदार संघाला आजगावकर यांच्यानंतर पुन्हा एकदा गावडे यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षक आमदार मिळाला आहे.