दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन व पेन्शन तातडीने जमा करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा सक्त आदेश

दिवाळी सणाच्या आधी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, निवृत्तीवेतनधारकांचे तसेच अंशकालीन निर्देशकांचे मानधन वेळेवर मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सक्त आदेश जारी केला आहे.

दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन व पेन्शन तातडीने जमा करा; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा सक्त आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिवाळी सणाच्या आधी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, निवृत्तीवेतनधारकांचे तसेच अंशकालीन निर्देशकांचे मानधन वेळेवर मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सक्त आदेश जारी केला आहे. संचालक शरद गोसावी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष पत्र पाठवून दिवाळीपूर्वी सर्व देयके अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. सणाच्या तोंडावर वेतन किंवा मानधन प्रलंबित राहिल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि प्रशासनही अडचणीत सापडू शकते, अशी बाब या आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे.

दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणापूर्वी पगार किंवा पेन्शन रखडल्यास कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे. शिवाय विधिमंडळातही याबाबत तारांकित आणि अतारांकित प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर नाहक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि विभागाची प्रतिमाही खराब होऊ शकते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन, निवृत्तीवेतन किंवा मानधन सणापूर्वी प्रलंबित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

नियमित वेतन, निवृत्तीवेतन, कंत्राटी शिक्षकांचे मानधन आणि अंशकालीन निर्देशकांच्या मानदानासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आधीच वितरित करण्यात आली आहे. आता उपलब्ध निधीचा योग्य वापर करून प्रत्यक्ष वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संचालनालयाने या आदेशाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचेही सांगितले आहे. क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी आणि वेतन पथक प्रमुखांनी या कारवाईकडे विशेष लक्ष देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शरद गोसावी यांनी केले आहे.

दिवाळीच्या आनंदावर कोणतीही सावली पडू नये आणि कर्मचाऱ्यांना सणापूर्वी आर्थिक स्थैर्य मिळावे, हा या आदेशाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण विभागातील हजारो कर्मचारी दिवाळीसाठी उत्सुक असतात आणि त्यांच्या वेतनावरच कुटुंबाचा खर्च अवलंबून असतो. म्हणूनच वेळेवर पगार देणे हे केवळ प्रशासकीय कर्तव्य नसून सामाजिक जबाबदारीही आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. संचालनालयाच्या या सक्त आदेशामुळे राज्यभरातील संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

आता सर्व स्तरांवर वेतन वाटपाच्या प्रक्रियांना गती देण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी सर्व देयके पूर्ण झाल्यास कर्मचारी समाधानी राहतील आणि शिक्षण विभागाचे कामकाजही सुरळीत चालेल. संचालनालयाच्या या आदेशामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.