सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासह स्वाभिमानाची ज्योत पेटवली ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे
आज देशात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवित आहेत. देशाच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या योगदानाला सावित्रीबाई फुले यांचा लढा प्रेरित करणारा आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रक्रमावर आहे. सावित्रीबाईंनी शिक्षणासह स्वाभिमानाची ज्योत पेटवली. तसेच शिक्षण मानवी मुल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्याचे द्वार खुले करण्याचे महान काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले,असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक दोन मध्ये डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने एक दिवा आपल्या दारी, एक दिवा शिक्षणाचा, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तक्षशिला महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, रमाई महिला मंडळ आदीसह प्रभागातील सर्व महिला मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. धेंडे बोलत होते. या वेळी विजय कांबळे, गजानन जागडे, अनिल कांबळे, कविता घाडगे, रजनी वाघमारे, लक्ष्मीकांत डोक्रस, मालती धिवार, मंगला गमरे, सोनिया शिंदे, राधा फ्रांसिस, मिना पाटील , मुग्धा जाधव, संगीता फ्रांसिस, कविता पारखे, मीना पांडे, सुरैया शोख, आस्मा शेख, जयश्री वाघमारे आदीसह महिला, प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
नागपूरचाळ - महाराष्ट्र हौसिंग बोर्ड - समता नगर मधील सर्व महिलांनी प्रत्येक घरी जाऊन " एक दिवा" लावला. तक्षशिला विहार, नागपूरचाळ येथून या उपक्रमाला सुरूवात झाली. भाजी मंडई येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. धेंडे म्हणाले की, आज देशात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवित आहेत. देशाच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या योगदानाला सावित्रीबाई फुले यांचा लढा प्रेरित करणारा आहे.
----------------------