शिक्षणमंत्री भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा; पुण्यात झळकले रस्त्यांवर बॅनर
कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे आम्हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिकतेचा कोणी विचार करणार आहे की नाही ? गुणवत्ता राखली जाणार का ? एससीईआरटीचे म्हणणे एक, आणि मुख्याध्यापक संघाचे दुसरेच यातून काही मार्ग निघेल का ? पालकांनाच प्रश्न पडलाय आमचे पालक कोण ? परीक्षेतील हा सावळा गोंधळ शिक्षणमंत्री भुसे काका तुम्ही तरी दूर करा, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांनी वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा (Annual Exam and PAT Exam) घ्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, त्यावर शिक्षक, मुख्याध्यापकांसह पालकांनी सुध्दा आक्षेप घेतला असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने (Secondary and Higher Secondary Principals' Association) वार्षिक परीक्षांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध (New schedule release) केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चांगलेच गोंधळात असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही चौकांमध्ये शिक्षणमंत्री भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा, अशा अशयाचे बॅनर झळकले आहेत.
कोलमडलेल्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे आम्हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मानसिकतेचा कोणी विचार करणार आहे की नाही ? गुणवत्ता राखली जाणार का ? एससीईआरटीचे म्हणणे एक, आणि मुख्याध्यापक संघाचे दुसरेच यातून काही मार्ग निघेल का ? पालकांनाच प्रश्न पडलाय आमचे पालक कोण ? परीक्षेतील हा सावळा गोंधळ शिक्षणमंत्री भुसे काका तुम्ही तरी दूर करा, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे.
शिक्षण विभाग आणि राज्य मुख्याध्यापक संघाने वेगवेगळी वेळापत्रके प्रसिद्ध केल्यामुळे कोणत्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार याबाबत सध्या अधिक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यात लक्ष घालतील का? विद्यार्थी पालकांमधील गोंधळ दूर करतील का?, SCERT आपले वेळापत्रक मागे घेणार की मुख्याध्यापक संघ, दोन वेगवेगळ्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र विभागाने ८ ते २५ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. ८ एप्रिलपासून आठवी व नववीच्या, १९ एप्रिलपासून सहावी व सातवीच्या, ९ एप्रिल पासून पाचवीच्या, २२ एप्रिलपासून तिसरी व चौथीच्या तर २३ एप्रिलपासून पहिली व दुसरीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तर १ मे रोजी निकाल जाहीर करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापक संघाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, ३ ते २४ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.