मोठी बातमी : SPPU विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा रद्द; कारण काय?
विद्यापीठाने 31 ऑक्टोबर 2026 रोजीच्या रद्द केलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा 11 नोव्हेंबर 2026 रोजी वेळापत्रकातील पूर्वनियोजित वेळेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे, असे पत्रक राजेंद्र तलवारे यांनी प्रसिद्ध केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतल्या जात आहेत. येत्या 31 ऑक्टोबर रोजी पुणे,अहिल्यानगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये विविध विषयांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रपती यांचा दौरा असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ .राजेंद्र तलवारे यांनी कळवले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा 2026- 27 ध्वजारोहण व राष्ट्रपती यांचा दौरा नाशिक व त्र्यंबक भागात असल्याने वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कळविले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आपल्या शनिवार, दिनांक 31 ऑक्टोबर रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाने 31 ऑक्टोबर 2026 रोजीच्या रद्द केलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा 11 नोव्हेंबर 2026 रोजी वेळापत्रकातील पूर्वनियोजित वेळेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे, असे पत्रक राजेंद्र तलवारे यांनी प्रसिद्ध केले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेपूर्वी एक दिवस आधी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर विद्यापीठातर्फे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाविद्यालयांचे कामकाज पाच वाजेनंतर बंद होते. आता सर्व विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे किंवा एसएमएस द्वारे पाठवावी लागेल, असे काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.एकूणच विद्यापीठाच्या प्रशासनाचा गोंधळ यावरून दिसून येतो,अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.