एमपीएससीची आणखी एक भरती रद्द; भाषा उपसंचालक पदाची जाहिरात मागे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अलीकडेच औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केल्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आयोगाने भाषा संचालनालयातील भाषा उपसंचालक (भाषांतर व परिभाषा), गट-ब या पदासाठी प्रकाशित केलेली जाहिरात अधिकृतपणे रद्द केली आहे.

एमपीएससीची आणखी एक भरती रद्द; भाषा उपसंचालक पदाची जाहिरात मागे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अलीकडेच औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केल्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आयोगाने भाषा संचालनालयातील भाषा उपसंचालक (भाषांतर व परिभाषा), गट-ब या पदासाठी प्रकाशित केलेली जाहिरात अधिकृतपणे रद्द केली आहे. आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित भरती प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे.

हा निर्णय राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर घेण्यात आला आहे. विभागाने भरती नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या सुधारणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना योमर्यादेत सवलत देण्यासारख्या बाबींचा समावेश आहे. नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सध्याची जाहिरात मागे घेणे आवश्यक ठरले, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

एमपीएससीच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियांबाबत अलीकडच्या काळात अनेक घडामोडी घडत आहेत. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या गंभीर आरोपानंतर आयोगाने यापूर्वी औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केली होती. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या परीक्षांबाबतही सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित परीक्षाही रद्द होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, भाषा उपसंचालक पदाच्या भरतीचे हे प्रकरण प्रश्नपत्रिका फुटीसारख्या गंभीर आरोपांपेक्षा वेगळे आहे. हे पूर्णपणे प्रशासकीय कारणांमुळे उद्भवले आहे. भरती नियम सुधारल्यानंतर आयोग नव्या जाहिरातीद्वारे प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे माहिती तपासत राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.