मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनी भरलेला परीक्षा शुल्क परत मिळणार; मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची अडचण येऊ नये यासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पात्र विद्यार्थी एकही रुपया न भरता परीक्षा अर्ज दाखल करू शकतील.

मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनी भरलेला परीक्षा शुल्क परत मिळणार; मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरण्याची अडचण येऊ नये यासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पात्र विद्यार्थी एकही रुपया न भरता परीक्षा अर्ज दाखल करू शकतील. आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेत शुल्कमुक्त अर्ज भरले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी शासनाने पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरला आहे त्यांना परतावा मिळणार आहे. त्या संबंधित माहितीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संचालनालय, विविध विद्यापीठे आणि परीक्षा विभागांच्या स्तरावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विद्यापीठांनी याबाबत परिपत्रके जारी करून ‘झिरो चलन’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांच्यासाठी परतावा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी विभागाने संपर्क व्यवस्थाही सुलभ केली आहे. परीक्षा शुल्कमाफीबाबत काही अडचण असल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यार्थी विकास विभाग किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठासाठी डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरसाठी डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९) आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी डॉ. अंधारे (९९७५०५५१५५) हे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

हा निर्णय दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने घेण्यात आला आहे. शासनाने विद्यापीठांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांना ही सवलत सहज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.