‘आरटीई’ पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला मुदतवाढ; 'या' दिवशी लागणार दुसरी प्रतिक्षा यादी

24 मार्च ते 1 एप्रिल ही मुदतवाढ प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ राहणार असून, 2 एप्रिलनंतर दुसर्‍या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी संधी दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आरटीई’ पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला मुदतवाढ; 'या' दिवशी लागणार दुसरी प्रतिक्षा यादी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 1 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीतील 26 हजार 166 विद्यार्थ्यांपैकी 6 हजार 376 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते.

आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 151 अर्ज दाखल झाले होते.

प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69 हजार 735 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्च ते 24 मार्च दरम्यान पार पडले. मात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेत साधारण प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेर्‍या राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे 24 मार्च ते 1 एप्रिल ही मुदतवाढ प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ राहणार असून, 2 एप्रिलनंतर दुसर्‍या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी संधी दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांनुसारच एसएमएस पाठवण्यात येईल. परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहणे आवश्यक आहे असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे.