ABVP ला तोडफोड भोवणार? राष्ट्रवादी, कृती समितीचा आक्रमक पवित्रा
विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या रॅप साँगविरोधातअभाविपकडून आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून आता वाद वाढला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (NCP) व विद्यार्थी कृती समितीने अभाविपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. (SPPU Rap Song Case)
विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या रॅप साँगविरोधात (Rap Song) अभाविपकडून आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अभाविपचे पदाधिकारी सभागृहात घुसले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे सदस्यांच्या अंगावर भिरकावले. त्याआधी सभागृहाच्या दरवाजाची तोडफोड केल्याचा दावा केला जात आहे. यावरून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम जाधव यांनी याबाबत कुलगुरूंना पत्र लिहून अभाविपवर कारवाईची मागणी केली आहे. आज विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घुसून धुडगूस व तोडफोड केली. या कृत्याचा तीव्र निषेध करतो. तसेच याआधी विद्यार्थी व संघटना रास्त शैक्षमिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या संघटनेवर विद्यापीठ प्रशासन कारवाई करण्यास भाग पाडत होते. परंतु आज जो धुडगुस व तोडफोड करण्यात आली त्यावर कार्य कारवाई करणार, असा सवाल जाधव यांनी केला आहे.
येत्या आठवडाभरात दोषींवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही जाधव यांनी दिला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीनेही या वादात उडी घेतली आहे. अभाविपवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी आपली भूमिका मांडली.
हेही वाचा : पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ABVP चा राडा
ससाणे म्हणाले, २०१९ मध्ये विद्यापीठाच्या रिफेक्ट्री मध्ये भोजनाच्या निकृष्ट दर्जा संदर्भात आंदोलन केले होते. त्यावेळी १२ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या सभागृहाची तोडफोड करण्यात आली आहे. हा महाराजांचा अपमान आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर विद्यापीठ कारवाई करणार का? गुन्हे दाखल करणार का?, असा सवाल ससाणे यांनी केला आहे.
दरम्यान, रॅपर शुभम जाधव याने विद्यापीठाच्या आवारासह ऐतिहासिक इमारतीत रॅप साँग चित्रित केले आहे. या गाण्यामध्ये शिव्यांचा भडिमार करण्यात आला आहे. तसेच कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून हातात तलवार, टेबलवर दारुची बाटली, ग्लास, पिस्तुल ठेवून गाणे तयार करण्यात आले आहे. यावरून बराच वाद निर्माण झाला असून राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेतली आहे.
-----------------------------
" विद्यापीठामध्ये एका विद्यार्थी संघटनेने आंदोलन करुन काचा फोटल्या. कुलगुरु प्र-कुलगुरु यांच्या समोर सुरू असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अडथळा आणला तेव्हा विद्यापीठाचा सुरक्षा विभाग,पोलीस प्रशासन काय करत होते. विद्यापीठात त्याच सभागृहात रँप करणार्या विद्यार्थीबाबत जी भुमिका विद्यापीठाने घेतली ती आता घेणार का? आंदोलन करणा-या संघटनेने विद्यार्थी हिताचेच प्रश्न घेतले. याबाबत शंकाच नाही. आंदोलन करण्याबाबत काहीही दुमतच नाही. पण कोणतीही लढाई लोकशाही मार्गांने झाली पाहीजे.पण हिंसा होत असेल, गालबोट लागत असेल तेही सर्वासमोर तर हे दुर्दवी आहे."
– कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडेंट हेल्पिग हॅंड
--------------------
"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह एबीव्हीपी च्या आंदोलकांनी फोडले आहे. मागण्या मान्य करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता ही हुकूमशाही पद्धत निषेधार्थ आहे. विद्यापीठ प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत."
- कमलाकर शेटे, कार्यवाह, युवक क्रांती दल (युक्रांद) पुणे शहर
------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एका रॅप गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. सदर गाणे हे विद्यापीठाच्या नावलौकिक तसेच सामाजिक सभ्यतेला शोभणारे नव्हते. गाणं तयार करून ते व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच आम्ही केली होती. पण विद्यापीठ प्रशासनाने याबाबत दिरंगाई चे धोरण अवलंबले. आज एका विद्यार्थी संघटनेने याबाबत आंदोलन केले तसेच त्यात तोडफोडी सारखे काही गैरप्रकार देखील घडले आहेत. आम्ही या तोडफोडीचे समर्थन अजिबात करत नाही पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची होत असलेल्या कारवाईचा देखील आम्ही तीव्र निषेध करतो. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात शैक्षणिक संकुला सारख्या पवित्र ठिकाणी होत असणारे असभ्य चित्रीकरण निंदनीय आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर जर वेळेत कारवाई केली असती तर आजची घटना घडली नसती. विद्यापीठाचे पावित्र्य राखण्यासाठी रस्त्यावर आलेले विद्यार्थी जरी इतर संघटनेचे असतील तरी विद्यार्थी हित जपणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई होणे गैर आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे शैक्षणिक आयुष्य जर खराब होणार असेल तर हे सहन केले जाणार नाही.
- कल्पेश यादव ,युवासेना ,राज्य सहसचिव