IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी; 1 हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
IDBI बँक अंतर्गत कार्यकारी (विक्री आणि संचालन) पदाच्या एकूण 1 हजार रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
IDBI बँक (IDBI Bank Recruitment) अंतर्गत कार्यकारी (विक्री आणि संचालन) (Sales and Operations Position) पदाच्या एकूण 1 हजार रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 नोव्हेंबर (Application deadline is November 16) 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
आयडीबीआय बँक मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दि. 7 नोव्हेंबर पासून लिंक सक्रिय करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.idbibank.in/ वर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. तसेच बँकेने घालून दिलेल्या शैक्षणिक अटीनुसार उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणक आणि आयटी संबंधित ज्ञान असणे गरजेचे आहे.
यासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असावे. त्यानुसार उमेदवाराचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1999 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑक्टोबर 2004 नंतर झालेला नसावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वय मर्यादा यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आला आहे. तर अन्य सर्व उमेदवारांना 1050 रुपये अर्ज शुल्क आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार १ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.