शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू, पवित्र पोर्टलच्या ऑनलाइन कामासाठी प्रशासकीय मान्यता

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आली असून त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू, पवित्र पोर्टलच्या ऑनलाइन कामासाठी प्रशासकीय मान्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरती (Teacher Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसर्‍या टप्प्यात पदभरती करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या (Teacher recruitment through Pavitra portal) ऑनलाईन कामासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता (Administrative approval for online work) दिली आली असून त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. 

राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामकाजासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले असतानाच, शासनाकडून भरती प्रक्रियेच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. 

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रिक्त पदांचा शैक्षणिक कामकाजावर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राबवण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला ६८ लाख ८४ हजार १२० रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली. त्यासाठीचा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.