मुंबई विद्यापीठाचा डंका : आविष्कार संशोधन स्पर्धेत जिंकली २३ पदके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ९२ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत (Maharashtra State Inter-University Invention Research Competition) मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University won 23 medals) डंका पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत विद्यापीठाने तब्बल २३ पदकांची जिंकली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (Dr. Babasaheb Ambedkar University of Technology, Lonere) येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ९२ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करून १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य असे एकूण २३ पदकं आपल्या नावी केली आहेत. मुंबई विद्यापीठाने आविष्कार संशोधन स्पर्धेवर सलग सहाव्यांदा विजयी मोहोर उमटली आहे. या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठाकडून या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला; वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी; मुलभूत शास्त्रे; शेती व पशू संवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली आहेत.
यामध्ये मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या प्रवर्गात ३ सुवर्ण, २ रौप्य, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी या प्रवर्गात ३ सुवर्ण, ३ रौप्य, मुलभूत शास्त्रे या प्रवर्गात २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, शेती व पशू संवर्धन या प्रवर्गात २ सुवर्ण, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या प्रवर्गात २ सुवर्ण, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गात १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदक पटकावले आहेत. या सहाही प्रवर्गात गटनिहाय विजेतेपद प्राप्त केले आहे.
संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या कल्पकतेतून आविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.