अभियांत्रिकी प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत; ४० टक्के जागांसाठी प्रवेश निश्चित.. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्‍यात असून, त्यासाठी उद्या सोमवार दि. ९ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत; ४० टक्के जागांसाठी प्रवेश निश्चित.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया (Engineering Admission Process) शेवटच्या टप्‍यात असून, त्यासाठी उद्या सोमवार दि. ९ सप्टेंबर ही प्रवेशाची अंतिम मुदत (Deadline for Admission is tomorrow) आहे. आत्तापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास ४० टक्के जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित ६० टक्के जागांसाठी तिसरी फेरी राबवण्यात येत आहे. त्यानंतर संस्थास्तर फेरीसाठी राज्यातील रिक्‍त जागांच्‍या स्‍थितीचे चित्र स्‍पष्ट होईल. रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर संस्‍थास्‍तर फेरी राबविली जाईल. तिसऱ्या फेरीत एक लाख ४४ हजार २३८ विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्‍ध झाली आहे. 

यापूर्वी दोन फेऱ्यांची प्रक्रिया पार पडलेली आहे. या फेरीपर्यंत ६१ हजार ४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित केले असून, उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत प्रवेश निश्‍चितीचे प्रमाण सुमारे ४० टक्‍के आहे. ७२ हजार विद्यार्थ्यांनी 'बेटरमेंट'चा पर्याय निवडला असून, ते आणखीन चांगले काॅलेज मिळावे या प्रतीक्षेत आहेत. तिसऱ्या फेरीत मोठ्या संख्येत प्रवेश निश्‍चिती होण्याची शक्‍यता आहे. या फेरीनंतर राज्‍यस्‍तरावर रिक्‍त राहणाऱ्या जागांचा अंदाज येऊ शकेल. दरम्‍यान, रिक्‍त जागांवर प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्‍ध असेल. या जागांवर संस्‍थास्‍तरावर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.

गेल्‍या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटता आहे.  त्‍यामुळे निम्म्‍याहून अधिक जागा रिक्‍त राहत होत्‍या. मात्र, आयटी क्षेत्रातील नोकरीत मिळणारे बलाढ्य पॅकेज अन्‌ व्‍यापक संधी लक्षात घेता, अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संगणक विषयाशी निगडित शाखेच्‍या प्रवेश क्षमतेत सातत्‍याने वाढ होत होती. सद्यःस्‍थितीत आयटी, कॉम्‍प्‍युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स ॲण्ड डेटा सायन्‍स, कॉम्‍प्‍युटर सायन्‍स, सायबर सेक्‍युरिटी आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांत रिक्‍त जागांवर संस्‍थापातळीवर प्रवेश दिले जातील. या अंतर्गत १० ते १३ सप्‍टेंबरदरम्‍यान रिक्‍त जागांची प्रसिद्धी, नोंदणीकृत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे, महाविद्यालयाचे संकेतस्‍थळ व सूचनाफलकावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे यासह यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवायची आहे.