विद्यापीठ दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या खिशाला भुर्दंड ; रिफेक्ट्रीतील मेंबरशीप बंद 

विद्यापीठात पूर्वी अनिकेत कॅन्टीन, ओपन कॅन्टीन ,ओल्ड कॅन्टीन या ठिकाणी अन्नपदार्थ मिळत होते. विद्यार्थी आपल्या विभागात जवळ किंवा जयकर ग्रंथालयाजवळ उपलब्ध असलेल्या कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करत होते.

विद्यापीठ दिरंगाईमुळे  विद्यार्थ्यांच्या खिशाला भुर्दंड ; रिफेक्ट्रीतील मेंबरशीप बंद 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रिफेक्ट्रीमध्ये (Refectory)कमी दरात गुणवत्तापूर्ण जेवण मिळावे, यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून विद्यापीठ प्रशासन समोर प्रश्न मांडत आहेत. मात्र, अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांना सध्या रिफेक्ट्रीमध्ये मेंबरशीपही (Refectory membership closed) मिळत नाही.परिणामी दररोज तब्बल 47 रुपये देऊन विद्यार्थ्यांना जेवण करणे भाग पडत आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मेसचा व बंद पडलेल्या उपहारगृहांचा प्रश्न (closed mess)लवकरात लवकर मार्गी लागवा, अशी मागणी केली जात आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत शैक्षणिक संस्थांचे रॅंकिंग नुकतेच जाहीर झाले. त्यात राज्य विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. असे असताना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पायाभूत गोष्टींसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. विद्यापीठात पूर्वी अनिकेत कॅन्टीन, ओपन कॅन्टीन ,ओल्ड कॅन्टीन या ठिकाणी अन्नपदार्थ मिळत होते. विद्यार्थी आपल्या विभागात जवळ किंवा जयकर ग्रंथालयाजवळ उपलब्ध असलेल्या कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करत होते. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने लॉ विभागाजवळ फूड मॉल उभा करून पूर्वी विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी उपलब्ध असलेले इतर सर्व पर्याय बंद केले आहेत.

विद्यार्थ्यांना कमी दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. विद्यापीठ प्रशासनाकडून केवळ निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम केले जात आहे. प्रत्यक्षात बंद पडलेली उपहारगृहे सुरू करण्यात विद्यापीठ प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. पूर्वी विद्यापीठातील रिफ्लेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा मेंबरशिप घेण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु, सध्या ही सुविधा बंद आहे. सध्या फुल थाळी 47 रुपये तर हाफ थाळी 38 रुपये या दराने थाळी घेऊन विद्यार्थ्यांना रिफेक्ट्रीत जेवण करावे लागत आहे. मेंबरशिप घेतल्यास विद्यार्थ्यांना 25 व 35 रुपये या दराने जेवण मिळत होते. मात्र, विद्यापीठाच्या प्रलंबित कारभारामुळे रिफेक्ट्री चालवण्यासाठी पूर्णवेळ कंत्राटदार अद्याप उपलब्ध झालेला नाही. मात्र, त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मेंबरशीपद्वारे जेवणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

----------------------------------------

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कमी दरात जेवणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली.मात्र, अद्याप रिफेक्ट्रीचालवण्यासाठी पूर्णवेळ कंत्राटदार मिळाला नाही.त्यामुळे आम्हाला दररोज हाफ किंवा फूल थाळी विकत घेऊन जेवण करावे लागते.पूर्वी हेच जेवण मेंबरशीपमुळे 25 ते 35 रूपायात मिळत होते. आता त्यासाठी 38 ते 47 रुपये मोजावे लागत आहे.आम्ही हा आर्थिक भुर्दंड आणखी किती महिने सहन करायचा. विद्यापीठाने यावर मार्ग काढावा. विद्यार्थ्यांनी किती दिवस दररोज खिचडी खाऊन दिवस काढावे.

-  मयूर जावळे,  विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 

-----------------------------

विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांसाठी बसण्यास पर्याप्त खुर्च्या व टेबल नाही. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेले फिल्टर खराब झाले आहे. सध्या पावसाळा असल्याने डेंगू, मलेरिया सारखे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.  त्यामुळे परिसरातील स्वच्छता होणे गरजेचे आहे. भोजन गुणवत्ता नियंत्रण समितीचा सदस्य या नात्याने मी विद्यापीठातील विविध उपहारगृहामध्ये तसेच फूड मॉलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने  रिफिस्ट्रीसह विविध उपहारगृहातील सोयी सुविधा तात्काळ सुधाराव्यात, असे निवेदन विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाला दिले असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी सांगितले.