ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन 

भारतातील प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पोखरण १ व पोखरण २ अणुचाचण्यांचे शिल्पकार डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज शनिवारी पहाटे ३.२० च्या सुमारास मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समई ते  ८९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतातील प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पोखरण १ व पोखरण २ अणुचाचण्यांचे शिल्पकार डॉ. राजगोपाल चिदंबरम (Dr. Rajagopal Chidambaram) यांचे आज शनिवारी पहाटे ३.२० च्या सुमारास मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समई ते  ८९ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे अचानक प्रकृती खालावल्याने डॉ. आर. चिदंबरम प्राणज्योत (Dr. R. Chidambaram passes away) मालावली. 

डॉ. चिदंबरम यांनी शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कारकिर्दीत भाभा अणु संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक, अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) अध्यक्ष, आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून काम केले. १९९४ ते ९५ या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही डॉ. चिदंबरम यांनी काम पाहिले  आहे.

भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावताना डॉ. चिदंबरम यांनी १९७५ मधील पोखरण १ आणि १९९८ मधील पोखरण २ या चाचण्यांमध्ये समन्वयाकाची भूमिका बजावली होती. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला गती दिली. डॉ. चिदंबरम यांना १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी भारत सरकारने सन्मानित केले.

डॉ.चिदंबरम यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू येथून पीएचडी केली आणि 1962 मध्ये भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. डॉ आर. चिदंबरम यांचे योगदान केवळ भारताच्या अणुकार्यक्रमातच नाही तर भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि संशोधन जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे.