शिक्षक भरतीला सुरुवात : स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांचा भरती प्रक्रियेत सहभाग
या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त जागांसाठी जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने १६ जानेवारी रोजीच आवश्यक आदेश प्रसिद्ध केले आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून मागील काही महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पवित्र पोर्टलद्वारे (Pavitra Portal) दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात (Teacher recruitment begins) झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त जागांसाठी जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने १६ जानेवारी रोजीच आवश्यक आदेश प्रसिद्ध केले आहेत.
मागील वर्षी जेव्हा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला तेव्हा २१ हजार ६७८ रिक्त जागांपैकी १९ हजार ९८६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १० टक्के रिक्त जागा, पहिल्या टप्प्यात अपात्र ठरलेले, गैरहजर किंवा रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागांसाठी जाहिराती प्रकाशित केल्या जाणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांना बिंदूनामावली तयार करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. बिंदूनामावली प्रमाणित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी विशेष शिबिरे आयोजित केली आहेत. २० जानेवारीपासून जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टलवर संधी दिली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.