देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? आताच अर्ज करा...
उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये ४५० रुपये भरावे लागणार असून हॉलतिकीट १० एप्रिल २०२५ पासून संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संरक्षण सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. संरक्षण सेवेमध्ये (Defense Services) अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती (Youth and young women of Maharashtra) जास्तीत जास्त संख्येने जावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे मुलांसाठी व नाशिक (nashik) येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (Institute of Military Pre-Service Education) स्थापना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या ४९व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या तिसऱ्या तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज (online application) मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र मुले https://spiaurangabad.com/ या संकेतस्थळावर तर मुली https://girlspinashik.spiaurangabad.com/ या संकेतस्थळावर जाऊन २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
पात्रता काय?
संरक्षण सेवेमध्ये भरती होण्यासाठी मुलगा/मुलगी अविवाहित असणे महत्वाचे आहे. ते महाराष्ट्राचे अधिवासी तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांचे अधिवासी हवे. त्यांची जन्मतारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मार्च/एप्रिल/ मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षेला बसणारा/बसणारी. (इ) जून २०२५ मध्ये इयत्ता ११वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे.
याशिवाय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी ते पात्र असावे. जसे की, UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावे. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २० एप्रिल २०२५ रोजी विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० मार्काचे बहुपर्यायी (Multiple Choice Questions), ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान (General Ability Test (GAT)) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला चार गुण व चुकीच्या उत्तरास एक गुण वजा केले जातील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई.च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये ४५० रुपये भरावे लागणार असून हॉलतिकीट १० एप्रिल २०२५ पासून संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन मेजर निवृत्त प्रभारी संचालक एस फिरासत यांनी केले आहे.