परीक्षेच्या प्रशासकीय कामकाजासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित : प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात परीक्षा विषयक कामांची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठीची प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

परीक्षेच्या प्रशासकीय कामकाजासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित : प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाविद्यालय स्थरावरील परीक्षेसंबंधी देयके सादर करत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या संदर्भात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची मते विचारात घेऊन ही प्रणाली विकसित केली आहे. प्रशासकीय कामात वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच अचूकता व पारदर्शकता आणण्यासाठी पेपरलेस प्रशासकीय कामकाज करण्यावर विद्यापीठाचा भर असणार आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वित्त व लेखा विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा विषयक कामांची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यशाळेचे उदघाटन  प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काळकर बोलत होते. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार, प्रभारी परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, वित्त व लेखा अधिकारी  चारुशीला गायके, प्राचार्य रितेश पाटील आदी उपस्थीत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव यांनी परीक्षा विषयक कामांच्या देयकांसाठी ऑनलाईन प्रणाली ही महाविद्यालयांसाठी उपयुक्त असून त्यामुळे प्रशासकीय दिरंगाई होणार नाही,असे मत व्यक्त केले. 

परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात, मुल्यमापनाचे कामकाज वेळेत व्हावे, यासाठी लवकरच प्राचार्य आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांची विद्यापीठ कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत पुणे शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ५५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. अण्णासाहेब निंबाळकर, डॉ. अजय कवाडे, गणेश साबळे यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अजय कवाडे यांनी केले तर आभार  डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.