कटारिया आर्ट ग्रुपची कल्लाकारी संध्याकाळ
"कटारिया आर्ट ग्रुप" च्या सदस्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणी जाग्याकरण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या माजी कला शिक्षिका शैलजा पाठक यांनी कला क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाने "कटारिया आर्ट ग्रुप" च्या सदस्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणी जाग्याकरण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
संध्याकाळची सुरुवात शालेय जीवनातील जुन्या फोटोंची चित्रफीत बघून मेमरी लेनच्या प्रवासाने झाली. सगळे फोटो हे शाळेने आयोजित केलेल्या कला प्रदर्शनाचे होते. त्या दिवसातील किस्से उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितल्याने व कला प्रकल्पांच्या कहाण्यांची देवाणघेवाण केल्याने आठवणीना उजाळा मिळाला. या आनंदात भर घालत, दोन माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलात्मक स्वभावाचे प्रदर्शन केले.
शंतनू राव यांनी त्यांच्या स्टँड-अप कॉमेडी मध्ये "मराठी माणूस, डिझाईनर आणि ओ सी डी" या अतरंगी विषयावरचे अनुभव सांगून, त्यांच्या तीक्ष्ण विनोद बुद्धीचे दर्शन घडवले. टाळ्यांचा कडकडाटात आणि पोटभर हसून सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर भावपूर्ण गायानाचे सादरीकरण करून रूपाली देशपांडे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व वातावरण अधिक सुरेल झाले.
कार्यक्रमाचा शेवट हा मृणाल केंची यांनी श्रीमती शैलजा पाठक यांची मुलाखत घेऊन केला. त्यातील "रॅपिड फायर" हा संस्मरणीय ठरला. आपल्या प्रिय शिक्षिके विषयी काही नवीन माहिती या मुलाखतीतून माजी विद्यार्थ्यांसमोर आली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
शाळा सॊडून अनेक वर्षे होऊन देखील हे माजी विद्यार्थी सातत्याने त्यांच्या कला शिक्षिका पाठक यांच्या बरोबर एकत्र येऊन नवनवीन प्रकल्प करत असतात. "या माझ्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह मला खूप समाधान व ऊर्जा देत राहतो" असे पाठक मॅडम यांनी या प्रसंगी व्यक्त केले.अजूनही काही नवीन कला प्रयोग एकत्र येऊन करण्याचे वचन देऊन सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.