अंजली दमानिया यांनी काढले अजित पवार, संतोष बांगर यांचे शिक्षण; बीएमसी लिपिक पद भरतीचा वाद
10 वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत. हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) कार्यकारी सहायक (Executive Assistant) (लिपिक) पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा पास असणे बंधनकारक करण्यात आले. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट राज्यातील 9 मंत्री आणि आमदारांचे शिक्षण काढले आहे.
मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 1 हजार 846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई महापालिकेने भरती प्रक्रियेत निश्चित केलेल्या काही अटींवर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेत क्लर्कच्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी ? तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी झगडावे लगते. 10 वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत. हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत.
अजित पवार 10 वी पास, विजय वडेट्टीवार 10 वी पास, गिरीश महाजन SYBCom, शंभूराज देसाई SYBCom, भारत गोगवले 8 वी पास, संदीपान भुमरे 10 वी पास, धरामरावबाबा अत्राम 10 वी पास, गुलाबराव पाटील 12 वी पास, संतोष बांगर 4 थी पास हे सगळे महाराष्ट्र चालवायला चालतात. मग लिपिक भरतीमध्ये 10 वी पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट कशासाठी ? असा संतप्त सवाल दमानिया उपस्थित केला आहे.
इंग्रजी व मराठी टाइपिंग आले पाहिजे ? BMC मधे टाइपरायटर आहेत तरी का ? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना. प्रकल्पग्रस्त हा प्रकल्प ग्रस्त असतो, मुंबई - ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. एक तर ही तारीख पुढे ढकलावी अन्यथा उमेदवारांसोबत चर्चा करून वरील तीन अटी रद्द कराव्यात,अशी मागणी त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्याकडे केली आहे.