एमएचटी सीईटी २०२७: डिसेंबरमधील परीक्षेच्या अफवांना सीईटी सेलचा थेट इशारा; खोट्या माहितीवर विशेष टास्क फोर्सची नजर
एमएचटी सीईटी २०२७ परीक्षेच्या तारखांबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि रील्समध्ये परीक्षा डिसेंबरमध्ये होणार असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट भूमिका घेतली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एमएचटी सीईटी २०२७ परीक्षेच्या तारखांबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि रील्समध्ये परीक्षा डिसेंबरमध्ये होणार असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट भूमिका घेतली आहे. सेलने पत्रक जारी करून अशा चुकीच्या, अपूर्ण किंवा खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील सर्व संबंधित सामग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे.
सीईटी सेलने नमूद केले आहे की प्रवेश परीक्षा, निकाल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच सोशल मीडियावर माहिती पसरवली जात आहे. अशा दाव्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक गोंधळ निर्माण होतो आणि विभागाच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होतो. एमएचटी सीईटी २०२७ ची परीक्षा डिसेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नाही. परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज नोंदणी आणि निकाल जाहीर होण्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, असे सेलने स्पष्ट केले आहे.

उच्चपदस्थ सूत्रांनुसार बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतरच सीईटी घेण्याचे नियोजन आहे. मात्र अचूक तारखांसाठी उमेदवारांनी केवळ सीईटी सेलच्या अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय एका यूट्यूब चॅनेलच्या संचालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी पॉडकास्टमध्ये परीक्षेच्या तारखा, अर्ज नोंदणी आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केल्याचा दावा केला होता. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित व्हिडिओ तातडीने हटवणे, स्पष्टीकरण प्रसिद्ध करणे आणि पुराव्यांसह लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपसारख्या विविध समाजमाध्यमांवर परीक्षा केंद्र बदलल्याचे दावे किंवा उमेदवारांचे पर्सेंटाइल वाढवून देण्याची आश्वासने दिली जात असल्यास विद्यार्थी आणि पालकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे सीईटी सेलने आवाहन केले आहे. अधिकृत माहितीसाठी फक्त सेलच्या अधिकृत वेबसाइट आणि घोषणांवरच विश्वास ठेवावा. खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सेलची टास्क फोर्स सक्रिय असून पुढील कारवाईही केली जाईल.