नियोजन व विकास विभागाला वालीच नाही; डॉ.परवीन सय्यद यांनीही सोडले विद्यापीठ
त्यात विद्यापीठाच्या कायदा कक्ष विभागाच्या वरिष्ठ कायदा अधिकारी डॉ.परवीन सय्यद यांची मुंबईतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलसचिव पदी निवड झाली आहे.
एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा आहे.अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने पदे रिक्त होत चालली आहेत. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागावर (Department of Planning and Development )झाला आहे. सुमारे एक महिन्यांहून अधिक कालावधीपासून या विभागाला उपकुलसचिवच (Deputy Registrar)मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचा नियोजन व विकास कोणाच्या भरवशावर सोडला आहे ?असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच विद्यापीठाच्या कायदा कक्ष विभागाच्या वरिष्ठ कायदा अधिकारी (Senior Law Officer)व कायदा व तक्रार निवारण कक्ष विभागाच्या उपकुलसचिव डॉ.परवीन सय्यद (Dr. Parveen Sayyed)यांची मुंबईतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलसचिव (Registrar, National Law University)पदी निवड झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विधी विभागही पूर्णपणे रिकामा झाला आहे.
विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाकडे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे 50 कोटी बजेट असणाऱ्या या विभागाचे बजेट कमी करत 20 ते 25 कोटी रुपयांवर आणले आहे. उपकुलसचिव डॉ.वैशाली साकोरे यांच्यानंतर या विभागाचा पदभार उपकुलसचिव वनसिंग वळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. परंतु, त्यांनी महिन्याभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतर या विभागाच्या उपकलसचिव पदाचा पदभार अद्याप कोणाकडेही दिला गेला नाही. या विभागाच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना तसेच विद्यापीठ आवारातील विभागांना सक्षम करण्याचे काम केले जाते. परंतु, उपकुलसचिव नसल्याने या विभागाला सध्या कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागासह शैक्षणिक प्रवेश विभाग, संलग्नता विभाग यासह अनेक प्रमुख विभागांमध्ये सहाय्यक कुलसचिव, कक्षा अधिकारी यासह लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.त्यामुळे रिक्त पदावर कर्मचारी व अधिकारी नियुक्त करावेत,अशी मागणी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
-----------------------------------
विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागाचा रिक्त झालेला उपकुलसचिव पदाचा पदभार लवकरच दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला जाईल.तसेच वरिष्ठ कायदा अधिकारी पद शासकीय असल्याने हे पद भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे