कृषी विद्यापीठातील कार्मचाऱ्यांना कायम करा; नितीन देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कामगारांना शासनाने २४ जुलै २०१५ च्या निर्णयानुसार कायम करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) कर्मचाऱ्यांना शासन निर्णय २४ जुलै २०१५ नुसार कायम करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) आणि कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आता त्यांच्या या मागणीला किती प्रतिसाद मिळणार याकडे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये हजारो मजूर 'डेली वेजेस' तत्त्वावर काम करत आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय कामगारांचा मोठा समावेश आहे. ७ जुलै २०१८ रोजी कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाच वर्षांपासून काम करणाऱ्या मजुरांना ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एससी, आणि खुला प्रवर्गानुसार कायम करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर ३ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा विनंती करण्यात आली. राहुरी, दापोली आणि परभणी कृषी विद्यापीठांमध्ये १६ नोव्हेंबर २०१५ रोजी मोठ्या प्रमाणावर कामगारांना कायम करण्यात आले. परंतु, अकोला विद्यापीठातील प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे २० ते ४० वर्षे काम करणाऱ्या मजुरांना शासनाचे संरक्षण मिळालेले नाही. त्यासाठी कामगारांनी मागील वर्षी १९ सप्टेंबरपासून १२ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते.