"शिक्षणामुळे स्त्रियांची प्रजननक्षमता..., मित्राने दारू प्यायला..."; MPSC ने विचारले अजब प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम !

परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे स्त्री प्रजनन क्षमतेवर आहे आणि दुसरा मद्यपानावर विचारण्यात आला आहे. यामुळे परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

"शिक्षणामुळे स्त्रियांची प्रजननक्षमता..., मित्राने दारू प्यायला..."; MPSC ने विचारले अजब प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) नुकतीच राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Civil Services Joint Preliminary Examination) घेण्यात आली. धक्कादायक बाबत म्हणजे या परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Social media viral questions) होत आहेत. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे स्त्री प्रजनन क्षमतेवर आहे आणि दुसरा मद्यपानावर विचारण्यात आला आहे. यामुळे परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

आयोगाकडून स्त्री प्रजनन क्षमतेवर एक प्रश्न विचारण्यात आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते? याचे कारण सांगा. त्यासाठी आयोगाने चार पर्याय दिले आहेत. 1) शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. 2) शिक्षित स्त्रियांना स्वत:च्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते. 3) शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. 4) स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. असे चार पर्याय आहेत. मात्र, या प्रश्नाचा शब्दाशी अर्थ काय होतो, याची थोडीशी तसदी आयोगाने घेणे महत्त्वाचे होते,अशी चर्चा सध्या सोशल मीडीयावर आहे.

याच परीक्षेत दुसरा प्रश्न हा मद्यपानावर आहे. त्यामध्ये असे विचारण्यात आले आहे, समजा तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वत:ला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ? असा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला आहे. यावर चार पर्याय देण्यात आले आहेत. 1) मी माझ्या मित्रांना सांगेन की मा‍झ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे. 2) दारू पिण्यास नकार देईन. 3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन. 4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे. असे हे चार पर्याय आहेत.

--------------------------------

हे दोन्ही प्रश्न आणि त्याच्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी भविष्यातील शासनाचे क्लास वन, क्लास टू अधिकारी असतील. त्यामुळे या परीक्षेत दारूसंबंधी प्रश्न विचारायला नको होता. हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय ? इतर लाखो प्रश्न उभे असताना अशा प्रश्नांची खरच गरज आहे का? यामुळे एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. त्यामुळे पुढील काळात आयोगाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

- एमपीएसी परीक्षार्थी (विद्यार्थी)
____________________________________

"स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते, कारण सांगा. अशा प्रकारच्या चुकीच्या प्रश्नांचे गांभीर्य आयोगाने लक्षात घेतले पाहिजे. पेपरला प्रश्न चुकीचा येणे ही नवीन गोष्ट नसली तरीही प्रश्नाचा केवढा मोठा गैरअर्थ निघू शकतो याची जाणीव आयोगाला असायला पाहिजे."

- एमपीएसी परीक्षार्थी (विद्यार्थिनी)
___________________________________

आयोगाने प्रश्न निवडण्यासाठी जे काही मंडळ निवडले आहे. त्यामध्ये तज्ज्ञ लोकांची निवड केली पाहिजे. ज्यामुळे आयोगाचे असे हास्य होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

 - महेश बडे, विद्यार्थी प्रतिनिती  (MPSC Students rights)
_________________________________

एकीकडे महिला सबलीकरणाचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे महिलांचे खच्चीकरण केलं जातंय. शिक्षणामुळे स्त्री प्रजनन क्षमता होते याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय घेयचा त्यामुळे हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारलेला आहे.

- किरण लिंभोरे, विद्यार्थी प्रतिनिती  (MPSC Students rights)