आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑफर

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली आहे.

आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑफर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेची  (IIT Mumbai) प्लेसमेंट प्रक्रिया (Placement Session 2024) नुकतीच पार पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पॅकेज वाढले असल्याचे चित्र असूण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट (Student Placement) मिळाले आहे.तसेच काही विद्यार्थ्यांना करोडो रुपयांचे पॅकेज मिळाले असले तरी काही विद्यार्थ्यांना आतापर्यंत सर्वात कमी पॅकेजही मिळाले आहे.

संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, यावर्षी सरासरी वार्षिक पॅकेज 7.7% ने वाढून 23.5 लाख रुपये झाले आहे. सर्वात कमी पॅकेज 6 लाख रुपयांवरून 4 लाख रुपयांवर घसरले आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी  388 कंपन्यांनी नोंदणी केली होती. तर 364 कंपन्यांनी ऑफर दिल्या आहेत. कॅम्पस ड्राइव्हद्वारे सुमारे 75% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात (Engineering and Technology) सर्वाधिक भरती झाली आहे. तसेच 78 आंतरराष्ट्रीय ऑफर स्वीकारण्यात आल्या आहेत. 

अहवालानुसार, देशातील 775 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑफर दिली आहे. तर 622 विद्यार्थी भारतीय कंपन्यांमध्ये सामील होणार आहेत. विशेष म्हणजे संस्थेतील 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑफर मिळाली आहे. 

सल्लागार क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा कमी भरती झाली आहे. वित्तीय सेवा क्षेत्रात 33 कंपन्यांनी 113 ऑफर दिल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रातही भरती झाली आहे. शिक्षण क्षेत्रात केवळ 11 कंपन्यांनी सहभाग घेतला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऑटोमेशन, एनर्जी सायन्स यासारख्या क्षेत्रातही भरती झाली आहे.

या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्लेसमेंटची टक्केवारी सुमारे 75 टक्के आहे. यावर्षी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांची भरती झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी माहिती तंत्रज्ञान आणि तांत्रिक नियुक्त्या थोड्या जास्त झाल्या आहेत.