आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; एक हजार रुपये विद्यावेतन मिळणार
प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन रक्कम मिळणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत खालील अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज २६ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील आदिवासी उमेदवारांकरिता (Tribal candidate) वर्ग-तीन व वर्ग चार पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र (District Skill Development, Employment and Entrepreneurship Information and Guidance Centre) येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Competitive Exam Pre-Training) येत्या १ डिसेंबर २०२४ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन रक्कम मिळणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत खालील अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचा नोंदणी क्रमांक इत्यादी बाबींचा उल्लेख करावा. सोबत विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरिता जिल्हा रोजगार केंद्रात नोंदणी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे २६ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा लागणार आहे. तसेच मूळ कागदपत्रांसह २७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदास्थळी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय १८ ते ३८ दरम्यान असावे. उमेदवार किमान एचएचएससी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेले असावे. शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधार कार्ड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद या कार्यालयाचे नोंदणी कार्ड इत्यादी कागदपत्रे उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.