मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल ग्रंथ प्रदर्शन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भाषेला अभिजात दर्जा कसा दिला जातो याबद्दल माहिती दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ग्रंथप्रदर्शन आयोजित करून एक विशेष सन्मानसोहळा साजरा केला. या प्रदर्शनात गाथासप्तशती, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, महात्मा फुले समग्र वाड्मय, संत साहित्य असे अनेक ग्रंथ ठेवण्यात आले होते, जेणे करून विद्यार्थ्यांना हे ग्रंथ पाहता येतील.
या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेच्या समृद्धतेवर प्रकाश टाकत डिजिटल युगामध्ये ग्रंथ वाचनाची आवड कशी निर्माण करावी, याबद्दल चर्चा केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भाषेला अभिजात दर्जा कसा दिला जातो याबद्दल माहिती दिली. त्यांनी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीची मराठी भाषा कशी होती, हे आपल्या शैलीत उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी केली, तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण ससाने यांनी मराठी भाषेची जडणघडण आणि सांस्कृतिक महत्त्व यावर विस्तृत विचार मांडले. त्यांनी उपस्थितांना काही रंजक गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्यात आले.
कार्यक्रमातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रश्नमंजुषा स्पर्धा, ज्यामध्ये १५३ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेत श्रावणी वेदपाठक आणि अश्विनी जाधव या विद्यार्थिनी विजयी ठरल्या, ज्यांना डॉ. लतेश निकम आणि डॉ. संकपाळ यांच्या हस्ते ग्रंथ देवून सन्मानित करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनाने देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळविला. उपस्थित प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे मराठी भाषेच्या महत्त्वाची जाणीव वाढली आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे आणि उपप्राचार्य डॉ. अनिल जगता, डॉ. गंगाराम सातव, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. टिळेकर, सूरज काळे, डॉ. वंदना सोनवले, ज्योती धोत्रे आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. सहायक ग्रंथपाल पवन कर्डक, जीवन शेळके, साधना काळभोर, जालिंदर मोरे, रेखा जंबे, भिसे प्रणाली, अक्षय कोकरे आणि अशोक शेकडे यांनीही या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.